Kanpur German shepherd Attack: श्वानाच्या हल्ल्यात मालकीणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाने घरातील वृद्ध महिलेवर हल्ला केला. श्वानाने महिलेला ओरबाडल्याने तिचा मृत्यू झाला. ही बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. कानपूर महापालिकेच्या पथकाने श्वानाला ताब्यात घेतले. त्यामुळे आता पाळीव श्वानांपासून सुरक्षेबाबत नागरिकांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.
कानपूरच्या विकासनगर भागात हा सगळा प्रकार घडला. मोहिनी देवी असं ८० वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. मोहिनी देवी या त्यांची सून किरण आणि नातू धीर प्रशांत त्रिवेदी यांच्यासह राहत होत्या. प्रशांतनेच घरात जर्मन शेफर्ड पाळला होता. काही दिवसांपूर्वी प्रशांत आणि त्याच्या आईचा अपघात झाला होता. दोघांच्याही पायाला दुखापत झाल्याने ते बेड रेस्टवर होते. १४ मार्च रोजीही प्रशांत आणि त्याची आई किरण त्यांच्या खोलीत आराम करत होते.
त्यावेळी मोहिनी देवी जर्मन शेफर्ड श्वानाला खायला द्यायला गेल्या होता. मोहिनी यांना पाहताच तो त्यांच्यावर भुंकायला लागला. त्यामुळे मोहिनी देवी घाबरल्या आणि काही वेळातच श्वानाने त्यांच्यावर हल्ला केला. काही वेळाने प्रशांत आणि किरण यांनाही श्वानाच्या भुंकण्याचे आवाज येऊ लागले. त्यांना वाटलं की श्वान बाहेरच्या व्यक्तीवर भुकत असेल. मात्र त्यानंतर मोहिनी यांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला.
त्यामुळे प्रशांत आणि किरण यांनी बाहेर धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पाहिलं की मोहिनी देवी या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या श्वानाने मोहिनी देवी यांच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि कमरेला चावा घेतला होता. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक राजकिशोर यादव यांनी पोलीस व महापालिकेला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी श्वानाला सोबत घेऊन गेले. "श्वानाने महिलेला अनेक ठिकाणी चावा घेतला होता. या घटनेमुळे श्वान पाळणाऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्या श्वानाला महिलेने स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवले, त्याची खूप चांगली काळजी घेतली, तिच्यावर त्याने हल्ला केला. श्वानाने त्या महिलेची अशी अवस्था केली होती की तिच्या घरच्यांनाही तिच्या जवळ जाता येत नव्हते," असं राजकिशोर यादव म्हणाले.