गैरमार्गाने पैसे वाचवण्याचा फटका अनेकांना बसतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पाहायला मिळाला. याठिकाणी लग्नात एका तरुणाला लाखो रुपये किमतीची आलिशान कार हुंडा म्हणून मिळाली, पण कारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाने रजिस्ट्रेशनचा खर्च वाचवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला. त्यामुळे कार थेट पोलीस ठाण्यात पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कानपूरमधील लाल बंगला येथे राहणारा एक तरुण आपल्या ऑडी कारमधून जात होता. त्याला चकेरीत दुसरी ऑडी गाडी दिसली, पण त्या ऑडीची नंबर प्लेट त्याच्याच ऑडी सारखीच होता, हे पाहून त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्याने चकेरी पोलिसांत तक्रार केली. एकाच नंबरची दोन वाहने असल्यामुळे पोलिसांनी रजिस्ट्रेशन न केलेली कार अडवून संबंधीत तरुणाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी केली असता त्याने हुंडा म्हणून ५५ लाख रुपयांची कार मिळाल्याचे सांगितले. एवढ्या महागड्या गाडीचे रजिस्ट्रेशनही खूप महाग आहे, त्यामुळे त्याच्या कारचे रजिस्ट्रेशन झाले नाही. अशा परिस्थितीत या तरुणाने आणखी एक मार्ग शोधला आणि एके दिवशी त्याला रस्त्यावर दुसरी ऑडी कार दिसली, तेव्हा त्याने त्या कारची नंबर प्लेट लावली. घटनेच्या दिवशी त्याच मूळ नंबरच्या कारच्या चालकाने ती पाहिली आणि पोलिसांत तक्रार केली.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, मूळ नंबर प्लेट असलेल्या कार मालकाच्या तक्रारीवरून बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या तरुणाची कार जप्त करण्यात आली. संबंधित तरुणाची विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याला घरी जाऊ दिले. मात्र कार पोलीस ठाण्यात उभी करून घेतली आहे. अशा स्थितीत पोलीस आता याप्रकरणी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.