नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद कानपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकींच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याच वेळी निर्माण झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. रुग्णालयात पोहोचली तेव्हा खूपच उशीर झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. भारतीय उद्योग संघटनेच्या स्थानिक महाविद्यालयाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष वंदना मिश्रा (Vandana Mishra) गोविंदपुरी पुलावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या.
वंदना मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यासाठी उशीर होत होता. याच दरम्यान तैनात असलेल्या पोलिसांना मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी वारंवार विनंती केली. मात्र विनंती करूनही परवानगी दिली नसल्याचं परिवाराने म्हटलं आहे. त्यानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेड कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांकडून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. जर वेळेत रुग्णालयात पोहोचलो असतो तर वंदना यांचा जीव वाचला असता असं म्हटलं आहे.
कानपूर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलने मिश्रा यांच्या मृत्यूबद्दल दिलगिरी व्यक्त केली. "राष्ट्रपती, बहीण वंदना मिश्रा यांच्या अकाली निधनामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांना व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली आणि शोकग्रस्त कुटुंबापर्यंत आपला संदेश पोहचविण्यास सांगितले. दोन्ही अधिकारी अंत्यसंस्कारात हजर झाले आणि शोकसंतप्त कुटुंबाला राष्ट्रपतींचा संदेश दिला" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षिततेसाठी कोणतीही अडचण येऊ नये, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मुळीच नाही. अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.