कानपूर: उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधील हॅलेट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका गर्भवतीची प्रसूती चक्क प्रसाधनगृहात करण्यात आली. त्यानंतर तिच्या बाळाचं डोकं कमोडमध्ये अडकलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. पण डॉक्टर आणि नर्सनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. महिला स्वच्छतागृहात गेली. तिथेच तिची प्रसूती झाली, असा आरोप पतीनं केला आहे.
हॅलेट रुग्णालयात बुधवारी रात्री मोबिन यांची पत्नी हसीना बानो यांना दाखल करण्यात आलं. हसीना तापानं फणफणल्या होत्या. हसीना ८ महिन्यांच्या गर्भवती होत्या. रात्री त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांनी याची कल्पना वॉर्डमधील नर्सला दिली. त्यावर रुग्णाला डिलिव्हरी वॉर्डमध्ये भरती करणं आमचं काम नसल्याचं उत्तर मिळालं. दरम्यान महिलेचे नातेवाईक तिला डिलिव्हरी वॉर्डमध्ये भरती करण्यासाठी गयावया करत होते.
हसीना लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेली. त्यावेळी कमोडवर गर्भवती महिला बाळंत झाली. महिलेच्या बाळाचं डोकं कमोडमध्ये अडकलं. प्रसूती झाली त्यावेळी बाळ जिवंत होतं. मात्र एमर्जन्सी विभागातून डॉक्टर आणि इतर कर्मचारी स्वच्छतागृहात उशिरा पोहोचले. तोपर्यंत बाळ दगावलं होतं, असा आरोप मोबिन यांनी केला.
बाळाच्या जन्मानंतर त्याचं डोकं कमोडमध्ये अडकले. बाळाचा जीव वाचवण्यासाठी मोबिन त्याचे पाय धरून बराच वेळ उभे होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाची अवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. कमोडमध्ये पाणी साचल्यानं बाळाला श्वास घेताना अडचणी आल्या. त्यातच डॉक्टर मदतीसाठी अतिशय उशिरा आले. त्यामुळे बाळ दगावलं, असा गंभीर आरोप मोबिन यांनी केला. कमोडवरील शीट तोडून बाळाला बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.