कानपूरमध्ये एका दुकानदारानं इस्लामचा प्रचार करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे. या दुकानदारानं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर 'इस्लाम- द ओन्ली सोल्यूशन' असं छापलं होतं. अशाच पावत्या तो दुकानात येणाऱ्या सर्व ग्राहकांना देत होता. दुकानदारानं ग्राहकाला दिलेल्या अशाच एका पावतीची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि प्रशासन खडबडून जागं झालं. सध्या कानपूर पोलीस दुकानदाराची संबंधित प्रकरणात चौकशी करत आहेत.
कानपूरच्या मेस्टन रोड येथील मंदिराच्या जवळील एका गल्लीबोळात सलीम नावाच्या व्यक्तीचं प्लास्टिक विक्रीचं दुकान आहे. सलीम अनेक जिल्ह्यांमध्ये प्लास्टिक पुरविण्याचा व्यवसाय करतो. याच दुकानातून ग्राहकाला देण्यात आलेलं ४७५० रुपयांचं एक बिल सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. या बिलाच्या शेवटी 'इस्लाम- द ओन्ली सोल्यूशन' असा संदेश छापण्यात आला आहे. १८ ऑक्टोबरची तारीख या बिलावर आहे.
बिलाच्या माध्यमातून इस्लामचा चुकीचा प्रचार केला जात असल्याची टीका सोशल मीडियात होऊ लागली. अवघ्या काही तासांत या बिलाची प्रत सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आणि कानपूरच्या कमिश्नरांची याची दखल घेतली. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी डीसीपी प्रमोद कुमार यांना दिले. दुकानदाराची यामागची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू आहे.