उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी चेकिंग दरम्यान एका बनावट इन्कम टॅक्स ऑफिसरला अटक केली आहे. तो गेल्या आठ महिन्यांपासून खोटं आयडीकार्ड दाखवून इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं सांगत होता. तो अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं चौकशीत उघड झालं. पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा सत्य समजताच कुटुंबीयांना देखील मोठा धक्काच बसला.
तरुणाने कुटुंबीयांना देखील खोटं सांगितलं होतं. आयकर विभागात नोकरी मिळाल्याचं आणि अधिकारी झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं होतं. लोकही त्याच्या जाळ्यात फसले आणि त्याला मान-सन्मान देऊ लागले. मात्र आता आरोपीचा पर्दाफाश झाला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी शहरात चेकिंग सुरू केली. 3 एप्रिल रोजी सायंकाळी एसीपी कल्याणपूर रावतपूर परिसरात फौजफाटा घेऊन तपासणी करत होते.
याच दरम्यान, एक काळ्या रंगाची कार आली ज्यावर भारत सरकार आणि आयकर अधिकारी लिहिलेली मोठी नेम प्लेट होती. पोलिसांनी चौकशी केली असता, रितेश शर्मा नावाच्या या तरुणाने आपण अधिकारी असल्याचं अभिमानाने सांगितलं. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे, असं विचारले असता, रितेश उत्तर देऊ शकला नाही.
संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याला पोलीस ठाण्यात नेले, तेथे पोलखोल झाली. चौकशीदरम्यान रितेश गेल्या आठ महिन्यांपासून बनावट आयकर अधिकारी म्हणून फिरत असल्याचे समोर आलं. इतकंच नाही तर तो आयकर अधिकारी झाल्याचंही त्याने घरच्यांना सांगितलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांनी आनंदाने पूजा केली. 200 ते 250 लोकांना बोलावून मोठी पार्टी देखील केली होती.
रितेश शर्मा रोज कामाच्या वेळी घरून निघायचा आणि संध्याकाळी परतायचा. आधी बाईक होती पण नोकरीच्या बहाण्याने वडिलांकडून गाडी घेतली. तुमचा मुलगा आयकर अधिकारी आहे, असे त्याने वडिलांना सांगितले. तो बाईकवरून गेला तर बरं दिसणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश परिक्षेची तयारी करत होता. तयारी करूनही निवड न झाल्याने त्यांनी बनावट अधिकारी बनण्याची योजना आखली. सध्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.