कानपूर:उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 3 जून रोजी मोठा हिंसाचार झाला होता. त्याप्रकरणी आता सरकारने कडक कारवाई केली आहे. हिंसाचारातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी 40 आरोपींची पोस्टर जारी केली आहेत. तसेच, ही पोस्टर सार्वजनिक ठिकणीही लावण्यात आली आहेत. कानपूर पोलिसांनी दगडफेकीत सामील असलेल्या आरोपींची फोटो जारी करत लोकांना (9454403715) या सरकारी क्रमांकावर माहिती देण्यास सांगितले आहे.
हिंसाचारानंतर पोलीस सर्व व्हायरल व्हिडिओची पडताळणी करुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 40 लोकांची ओळख पटली आहे. इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी विविध सोशल मीडिया खातेही तपासले जात आहे. पोलीस आयुक्त विजयसिंह मीना म्हणाले की, आम्हाला आरोपींना कडक संदेश द्यायचा आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल.
हाश्मीच्या पीएफआयशी संबंधित कागदपत्रे2015 मध्ये पहिल्यांदा सिसामाऊ येथे धार्मिक मिरवणुकीत हिंसाचार झाला, तेव्हा आरोपींचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, कानपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार जफर हयात हाश्मी याच्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे पीएफआयकडे सापडली आहेत. त्याला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पेट्रोल पंपाचा परवाना रद्दकानपूरमधील डेप्युटी पॅडजवळील पेट्रोल पंपावरुन हिंसाचार पसरवणाऱ्यांना बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यात आले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये याचे पुरावे मिळाले आहेत. कारवाई करत पेट्रोल पंपाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कानपूरमधील हिंसाचारात पेट्रोल बॉम्बचा प्रचंड वापर करण्यात आला, याशिवाय दगडफेकही उग्रपणे करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहेकानपूरमध्ये हिंसाचार कसा वाढला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचाही एटीएस प्रत्येक अँगलने तपास करणार आहे. यासाठी एडीजी एटीएस नवीन अरोरा कानपूरला पोहोचले असून, त्यांच्यासोबत खास कमांडोही उपस्थित आहेत. एडीजी नवीन अरोरा एटीएसच्या जवानांसह हिंसाचारग्रस्त भागात गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटवली जात आहे. आरोपींवर गँगस्टर अॅक्ट आणि एनएसए लावण्यात येणार आहे. त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे.
कानपूर हिंसाचारप्रकरणी 36 जणांची नावे 24 जणांना अटकपोलिसांनी पहिल्या एफआयआरमध्ये हयातसह 36 जणांची नावे, दुसऱ्या एफआयआरमध्ये 350 अनोळखी आणि तिसऱ्या एफआयआरमध्ये हजारोंच्या अज्ञात जमावाविरुद्ध नोंद केली आहे. ही घटना षडयंत्र असल्याचा भास होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी याचा संबंध तपासला जात आहे.