मुंबई : आतापर्यंत मराठी माणसासाठी लढण्याची भाषा करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र उत्तर भारतीयांवर विसंबून राहावे लागणार आहे. येथील उमेदवारीदेखील अखिलेश चौबे या उत्तर भारतीय उमेदवाराला देण्याशिवाय मनसेकडे सध्या तरी अन्य कोणताच पर्याय नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात मनसे मराठीच्या मुद्द्यावर कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यमान आमदार कॉँग्रेसचे रमेशसिंग ठाकूर तर भाजपाचे अतुल भातखळकर असे दोन तगडे उमेदवार या मतदारसंघात आहेत. उत्तर भारतीय मतांवर भिस्त असलेल्या काँग्रेससह भाजपा आणि आता मनसे मैदानात असल्याने येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. ‘व्यक्तीच्या नावावर काही अवलंबून नसते. स्थानिक लोकांना सुखसुविधा पुरवण्यासाठी आडनावाचा अडथळा येत नाही. मी स्वत:ला मराठी माणूसच मानतो,’ असे मत चौबे यांनी मांडले. २००९ साली विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले रमेशसिंग ठाकूर विकासकामांसह मतदारांसमोर जाणार आहेत. ठाकूर यांचा भर त्यांनी सुरू केलेल्या शाळा, महाविद्यालये यांना आहे. आरोग्यसेवा, वीज-पाणी, पक्के रस्ते या मूलभूत गरजांव्यतिरिक्त उड्डाणपूल, खेळण्यासाठी मैदाने, शॉपिंग मॉल, पार्किंग स्पेस या सुविधा उभारल्याचा दावा ठाकूर करत आहेत. ‘मतदार उमेदवार कोणता भाषिक आहे, हे पाहत नसून त्याचे चारित्र्य व त्याने केलेले कार्य बघत असतो,’ असे मत भातखळकर यांनी व्यक्त केले.
कांदिवली पूर्वेत मनसेची भिस्त उत्तर भारतीयांवर
By admin | Published: September 24, 2014 2:41 AM