ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खळबळजनक आरोपांची मालिका सुरू केली आहे. आज सकाळी राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्याचा आरोप केला. तसेच अरविंद केजरीवाल यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत राजीनामा द्यावा. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर मी त्यांची कॉलर धरून त्यांना तिहार तुरुंगात टाकेन, तशी शपथ मी घेतली आहे असं त्यांनी ठणकावलं. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मिश्रांना चक्कर आली आणि ते खाली पडले. मिश्रांना सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यावेळी बोलताना, केजरीवालांनी देशाचा विश्वासघात केला आहे. पक्षासाठी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्या तसेच पैशाची गरज नसतानाही लोकांकडून 10-10 रूपये वसूल करण्यात आले, त्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आले. तसेच नोटबंदीच्या काळातही काळा पैसा पांढरा केला जात होता असा आरोपही कपिल मिश्रा यांनी केला. अधिकाधिक बँक खाते अॅक्सिस बँकेतील असून याच खात्यातील पैसा नोटबंदीच्या काळात पांढरा केला जात होता आणि त्यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली असं ते म्हणाले.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मिश्रा उपोषणास बसले आहेत.
काय आहे आरोप-
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले.
याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.