ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हटवण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली आहे.
दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप करून कपिल मिश्रांनी आज दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. यावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, कपिल मिश्रांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे असून हे सर्व आरोप निराधार आहे. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोप नाही असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून कोणत्याही आधाराशिवाय हे आरोप करण्यात आल्याचं ते म्हणले.
काय आहे आरोप-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले आणि हे मी स्वतः पाहिलं असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले.
याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.