मुंबई : कपिल शर्मा याने लाचखोर अधिकाऱ्याचे नाव सांगावे, त्यामुळे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल, या महापालिकेच्या आवाहनाला २४ तास उलटूनही विनोदवीर कपिल शर्मा याने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. परिणामी लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाबाबत गूढ असून, कपिल हे नाव जाहीर करेपर्यंत हा ‘हास्यास्पद’ शो सुरूच राहणार आहे.शुक्रवारी पहाटे कपिल शर्माने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचे टिष्ट्वट केले आणि दिवसभर याच प्रकरणाची चर्चा रंगली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कपिल शर्माला अधिकृतरीत्या पत्र लिहून तो लाचखोर कोण? अशी विचारणा केली. मात्र ज्या आपल्या कार्यालयाचा उल्लेख त्याने केला ते अनधिकृत असल्याचे समोर आले आणि कपिलचे टीकास्त्र त्याच्यावरच उलटले आहे.महत्त्वाचे म्हणजे या अनधिकृत बांधकामासाठी महापालिकेने १६ जुलै २०१६ रोजी कपिलला नोटीस पाठवली होती. शिवाय बांधकामावर हातोडाही मारला होता. या बांधकामाची महापालिकेच्या विभाग कार्यालयाने शनिवारी पाहणी केली. यावेळी तोडण्यात आलेले बांधकाम ‘जैसे थे’ असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शनिवारच्या या कारवाईनंतर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनीही कपिल याला ‘लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा. त्यामुळे योग्य ती कारवाई करता येईल,’ असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)वर्सोव्यात ज्या ठिकाणी हे कार्यालय बांधण्यात येत आहे; तो भाग रहिवासी बांधकामासाठी राखीव आहे. मात्र येथे व्यावसायिक बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने नोटीसही बजावली. ‘वॉचडॉग फाउंडेशन’नेही हे बांधकाम नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे म्हटले आहे.
कपिल शर्माचे ‘मौन’ कायम
By admin | Published: September 11, 2016 4:09 AM