कपिल सिब्बल यांनी बुधवारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014 पासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील झाल्याचा दावा सिब्बल यांनी केला आहे. त्यापैकी 23 जणांना दिलासा मिळाला आहे. भाजपा हे 'वॉशिंग मशिन' बनले आहे, ज्यात भ्रष्ट नेत्यांचे डाग गेल्याबरोबर धुतले जातात, असा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. भाजपामध्ये गेल्यानंतर नेत्यांवर दाखल झालेले भ्रष्टाचाराचे गुन्हे बंद करण्यात येत असल्याचं विरोधकांचं म्हणणे आहे.
कपिल सिब्बल यांनी एका बातमीच्या आधारे हा दावा करण्यात केला आहे. मात्र, सिब्बल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना मात्र ही बातमी शेअर केलेली नाही. "विरोधकांविरुद्ध भाजपाची राजकीय चर्चा: कथित भ्रष्टाचार पण तरीही भ्रष्टाचाऱ्यांना मिठी मारा. 2014 पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या 25 नेते भाजपामध्ये सामिल झाले आणि 23 जणांना दिलासा मिळाला" असं कपिल सिब्बल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 2014 पासून कथित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय संस्थांकडून कारवाईचा सामना करणारे 25 प्रमुख नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत. या नेत्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष असे पक्ष सोडले आहेत. यामध्ये सर्वाधिक 10 नेते काँग्रेसचे होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होते, मात्र नंतर ते भाजपामध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यापैकी चार नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे तीन, टीडीपीचे दोन आणि समाजवादी पक्ष आणि वायएसआरसीपीचा प्रत्येकी एक नेता भाजपामध्ये दाखल झाला. भाजपामध्ये प्रवेश केल्याने 25 पैकी 23 नेत्यांना दिलासा मिळाला आहे. या 23 नेत्यांपैकी 3 विरुद्ध दाखल झालेले गुन्हे बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच 25 नेत्यांपैकी 6 नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर या नेत्यांवरील तपास यंत्रणांची कारवाई मंदावली आहे.
2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईत वाढ झाल्याचा रिपोर्ट इंडियन एक्स्प्रेसमध्ये देण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला सामोरे गेलेले 95 टक्के नेते विरोधी पक्षातील होते. त्यामुळेच विरोधक भाजपाला 'वॉशिंग मशीन' म्हणत असून त्यात सामील झाल्यानंतर भ्रष्ट नेत्यांचे डाग धुतले जात आहेत. भ्रष्ट नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांच्यावरील खटले बंद करण्यात येत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.