कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 04:04 PM2019-02-12T16:04:38+5:302019-02-12T16:10:56+5:30

काँग्रेस नेते कपिल सिब्बल सोशल मीडियावर ट्रोल

Kapil Sibal defends Anil Ambani in court attacks him outside trolled on social media | कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

Next

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांची आज चांगलीच तारांबळ उडाली. एका बाजूला पेशा सांभाळायचा आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचा वरिष्ठ नेते म्हणून मिळालेली जबाबदारीही पार पाडायची, अशी तारेवरची कसरत कपिल सिब्बल यांना करावी लागली. मात्र ज्या व्यक्तीचा न्यायालयात बचाव केला, त्याच व्यक्तीवर न्यायालयाच्या बाहेर येताच टीका केली, यावरुन सिब्बल सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. 




रिलायन्स विरुद्ध एरिक्सन प्रकरणात आज कपिल सिब्बल यांनी रिलायन्सची म्हणजेच अनिल अंबानींची बाजू मांडली. रिलायन्सनं (आर कॉम) एरिक्सन इंडियाचे पैसे थकवले आहेत. ते पैसे मिळावेत यासाठी कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच रिलायन्स कम्युनिकेशननं दिवाळखोरी जाहीर केली. आर कॉमनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा दावा एरिक्सननं केला. या प्रकरणात आज रिलायन्सचे अनिल अंबानी न्यायालयात हजर झाले. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. 







सर्वोच्च न्यायालयात जाऊन अंबानींच्या वतीनं युक्तीवाद करण्याआधी सिब्बल यांनी त्यांच्यावरच जोरदार टीका केली. मोदी सरकारनं अनिल अंबानींना राफेलचं कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला. 'एअरबस, फ्रेंच सरकार, अनिल अंबानी या सर्वांना पंतप्रधान सामंजस्य करार करणार असल्याची माहिती होती. मोदी 9 ते 11 एप्रिल 2015 दरम्यान फ्रान्समधील असतील. त्याचवेळी करारावर स्वाक्षऱ्या होतील, याची कल्पना अंबानींना होती,' असं सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं. संरक्षण करारासारखी गोपनीय बाब अंबानींना कशी काय समजली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 







अनिल अंबानींना राफेल करारावरुन लक्ष्य करणारे सिब्बल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. एका बाजूला अंबानींवर टीका करता, कोर्टाबाहेर त्यांच्यावर तोंडसुख घेता आणि कोर्टात जाऊन त्यांच्याच बाजूनं युक्तीवाद करता? हा दुटप्पीपणा नाही का? असा प्रश्न अनेकांनी सिब्बल यांना विचारला. तर काहींनी सिब्बल दोन्हीकडून फायद्यात राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. नेते म्हणून अंबानींवर टीका करुन सिब्बल पक्षासमोर चमकतात. तर दुसरीकडे वकील म्हणून अंबानींची बाजू मांडून पैसाही कमावतात, असं अनेकांनी ट्विटमधून म्हटलं आहे. 

Web Title: Kapil Sibal defends Anil Ambani in court attacks him outside trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.