नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षापासून अलिप्त असलेले कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच, समाजवादी पार्टीच्या मदतीने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही त्यांना राज्यसभेची जागा दिली आहे. कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. आता कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोक पक्षात येतच राहतात. कपिल सिब्बल गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही झाले.
एका वृत्तानुसार,केसी वेणुगोपाल यांनी कपिल सिब्बल यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी कोणालाही दोषी धरले जाणार नाही. उदयपूरमधील चिंतन शिबिरानंतर नियोजनबद्ध पद्धतीने पक्षाची पुनर्बांधणी सुरू असल्याचे ते म्हणाले. वेणुगोपाल म्हणाले, "कपिल सिब्बल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी काँग्रेसच्या मूल्यांवर विश्वास व्यक्त केला होता. त्याशिवाय त्यांनी काही बोलले नाही. त्यांना आधी त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या, त्यानंतर आम्ही काही बोलू शकतो. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. इथे लोक पक्षात येतात-जातात. काही लोक इतर पक्षात सामील होतात. पक्ष सोडून गेलेल्या कुणालाही मी दोष देऊ इच्छित नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, ज्यामध्ये जागा कमी नाही आहे."
याचबरोबर, "काँग्रेस पक्षाची संपूर्ण पुनर्बांधणी केली जाईल. सर्वसमावेशक पुनर्रचना करून जनतेपर्यंत जाण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षातील प्रत्येक व्यक्तीला संघटनेचे काम मिळाले आहे, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. दरम्यान, याआधी कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, "मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही. मी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मला काँग्रेससाठी काहीही बोलायचे नाही. ते माझ्यासाठी योग्य नाही. मी अखिलेश यादव यांचा आभारी आहे."