नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेला दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून (Congress) होणारे नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पलायन, अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे जुने अथवा वरिष्ठ नेते चिंतीत दिसत आहेत. काँग्रेसची ही घसरण पाहता, पक्षातील वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal), यांनी नेतृत्व बदलासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 मधील नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे, असे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधी यांना उघडपणे पद सोडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षातील एबीसी माहिती नसलेल्या नेत्याने अशा प्रकारचे विधान करणे अपेक्षित नाही असं म्हटलं आहे. तसेच "कपिल सिब्बल एक प्रसिद्ध वकील असून ते काँग्रेसच्या संस्कृतीतून आलेले नाहीत. सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी त्यांना अनेकवेळा संधी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाविषयी ज्या व्यक्तीला ABC माहिती नाही, अशा व्यक्तीने काँग्रेसविषयी विधाने करणे अपेक्षित नाही" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले, पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. 8 वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
"काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार. सर्वांची काँग्रेस म्हणजे, केवळ सोबत असणेच नाही, तर भारतातील ज्या लोकांना भाजप नको आहे, अशा सर्व लोकांना एकत्रित आणणे आहे."
"ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, हे सर्व जन काँग्रेसचेच होते. मात्र, सर्व जण दूर गेले आहेत. या सर्वांना एकत्रित आणायचे आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कुण्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्विकारावे लागेल" असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.