“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:33 PM2022-02-08T22:33:35+5:302022-02-08T22:35:02+5:30

काँग्रेसने रेल्वे स्टेशन बांधले केले नसते, तर पंतप्रधान मोदींनी चहा कसा विकला असता, अशी खोचक विचारणा कपिल सिब्बल यांनी केली आहे.

kapil sibal replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha | “PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल

“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल

Next

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. लता मंगेशकर यांच्यापासून महागाईपर्यंत अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटातील प्रमुख नाव कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधले असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. 

आयआयटी आणि आयआयएम या संस्था मोदींनी नाही, तर काँग्रेसने निर्माण केल्या होत्या. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीच्या मैदानाप्रमाणे भाषण केले. मलाही पंतप्रधान मोदींना इतिहास समजावून सांगायचा आहे. पंतप्रधान मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते, ते काँग्रेसने तयार केले होते. जर काँग्रेसने ते रेल्वे स्टेशनच तयार केले नसते तर पंतप्रधान मोदींनी चहा कसा विकला असता, असा प्रतिप्रश्न कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद, जुनागढसाठी रणनिती बनवली, पावले उचचलली, तशी प्रेरणा घेत गोव्यासाठी रणनिती बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे गुलामीत रहावे लागले नसते, असे सांगत गोव्यात विधानसभा निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आणत काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. 

दरम्यान, संसद हे कायदेमंडळ आहे, तो राजकीय सभेचा आखाडा नाही. बहुदा पंतप्रधान हे विसरले असावेत. पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी किमान ५० वेळा काँग्रेसचा गजर करून एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला. खोटा इतिहास सांगून मते मिळविण्याचा पंतप्रधानांचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका महाराष्ट्रातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. 
 

Web Title: kapil sibal replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.