UP Elelction: “अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:19 PM2021-06-10T18:19:36+5:302021-06-10T18:22:21+5:30
UP Elelction: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर देत आणखी वाईट परिस्थिती ओढवू शकेल, असा सूचक इशारा दिला आहे.
नवी दिल्ली: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election) रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर देत आणखी वाईट परिस्थिती ओढवू शकेल, असा सूचक इशारा दिला आहे. (kapil sibal told to congress leadership that if you do not listen you will fall into bad days)
जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. मात्र, त्यांनी जे केले, त्याविरोधात मी नाही. त्यांच्याकडे त्यासाठी योग्य कारण असू शकेल. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता ‘प्रसादा’च्या राजकारणाकडे वळू लागल्याचे हे प्रतिक आहे. माझ्या जन्मापासून मी भाजपाला विरोध करत आलो आहे. त्यामुळे जिवंतपणी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे सिब्बल यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
I am sure leadership knows what the problems are and I hope the leadership listens because nothing survives without listening, no corporate structure can survive without listening and so is with politics. If you don't listen, you will fall into bad days: Kapil Sibal
— ANI (@ANI) June 10, 2021
दुसऱ्यांचे ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही
मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत.
अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत संतापले
काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे
काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी पुनर्रचना करणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखाने ऐकलेच नाही किंवा ऐकणे सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचे ऐकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत तुम्ही जर ऐकले नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशाराही सिब्बल यांनी दिला आहे.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले जितीन प्रसाद युपीए-२ च्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. काँग्रेसमधील कार्यप्रणाली आणि पक्षनेतृत्व बदलाविषयी २०१९मध्ये आवाज उठवणाऱ्या जी-२३ गटामध्ये त्यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षात नेतृत्व बदलाची गरज आहे. गेल्या ६ ते ७ वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. अनेकदा याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे कोणीच ऐकून घेतले नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण होता, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.