नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन राहुल गांधींनाच लक्ष्य केलं. मात्र, काही वेळातच सिब्बल यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधींनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.
भाजपासोबत हातमिळवणी करून सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र लिहिण्यात आल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, असा पवित्रा आझाद यांनी घेतला. तर, कपिल सिब्बल यांनी ट्विट व फेसबुकवरुन राहुल गांधींना अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं होतं. 'आम्ही भाजपाशी संगनमत केलंय, असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधाम केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,' अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काही वेळातच सिब्बल यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. पण, फेसबुकवरील त्यांची पोस्ट तशीच होती.
भाजपा सोशल मीडियाच्या राष्ट्रीय निरीक्षक प्रिती गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन सिब्बल यांची फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यासोबतच, सिब्बल यांनी ट्विट डिलीट केलं, पण फेसबुक पोस्ट तशीच आहे, असे म्हटले होते. प्रिती गांधी यांच्या ट्विटनंतर काही तासांतच सिब्बल यांनी फेसबुक पोस्टही डिलीट केली आहे. सिब्बल यांनी आपल्या पोस्ट डिलीट करुन नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, राहुल गांधींशी माझं व्यक्तीगत बोलणं झालं नाही, ते तसं काहीही बोलले नाहीत. त्यामुळे, मी माझे ट्विट मागे घेत असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. तशीच पोस्ट सिब्बल यांनी फेसबुकवरुनही केली आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.