कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि भाजपा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका कारने बुधवारी तीन जणांना चिरडलं, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. आता स्वत: करण भूषण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर होती असं म्हटलं आहे.
करण भूषण शरण सिंह म्हणाले की, "ही एक दुःखद घटना होती. आम्ही 3-4 वाहनांचा ताफा घेऊन एका कार्यक्रमाला जात होतो. मला एक फोन आला होता, फोनवर एक अपघात झाला आहे ज्यात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं. हे ऐकल्यावर मलाही धक्का बसला होता. त्यानंतर नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी मी एक वाहन घटनास्थळी पाठवलं होतं."
"एक महिला रस्ता ओलांडत होती. ही मुलं बाईकवरून येत होती. त्यांचाही दोष नव्हता. बाईक डिसबॅलेन्स होऊन पडली. बाईक डाव्या बाजूला पडली आणि बाईक घसरताच अपघात झाला. अपघाताला कारणीभूत असलेली गाडी आणि माझी कार यामध्ये 4-5 किलोमीटरचे अंतर होतं."
"आमच्या ताफ्याच्या वाहनाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी दोषी नाही. मीडियामध्ये माझी चुकीची प्रतिमा तयार केली जात आहे. जे काही घडलं ते घडणारचं होतं असं समजा. त्या मुलांचं जाणं लिहिलं होतं. विरोधक याचा राजकीय मुद्दा बनवत आहेत."
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, माहिती देताना पोलिसांनी सांगितले होतं की, बुधवारी कैसरगंजमधील भाजपा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली. करण सिंह हे कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं असून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता