रोहतक : राष्ट्रीय पातळीवरील कराटे चॅम्पियन असलेल्या तरुणीची छेड काढणाऱ्या वाहतूक पोलिसाला अटक करण्यात आली असून, त्याला सेवेतूनही निलंबित करण्यात आले आहे. शेअर रिक्षामध्ये तिच्या शेजारी बसून, या पोलीस शिपायाने तिचा विनयभंग केला.ही राष्ट्रीय पदकविजेती कराटेपटू शुक्रवारी संध्याकाळी शेअर रिक्षामधून घरी जात असताना हा प्रकार घडला. ती कराटे क्लासमधून घरी जाण्यासाठी रिक्षात बसताच हा वाहतूक पोलीस कर्मचारी तिच्याच शेजारी येऊ न बसला. रिक्षा सुरू होताच, त्याने तिच्यानजीक सरकण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने या प्रकारास विरोध केला व त्याला नीट बसायला सांगितले.त्यानंतर त्या तरुणीला आपल्याशी मैत्री कर, असा आग्रह तो धरू लागला. एवढेच नव्हे, तर त्याने तिचा मोबाइल क्रमांक मागितला.मी त्याला अनेकदा गप्प व नीट बसण्यास सांगितले. पण तो ऐकायला तयार नव्हता आणि घसट करू पाहत होता. त्यामुळे या तरुणीने त्याला रिक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकानेही त्या तरुणीला मदत केली.आपली आता खैर नाही आणि कदाचित आपणास मारहाण होईल, अशी भीती वाटताच वाहतूक पोलिसाने रिक्षातून बाहेर पडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरुणीने रिक्षाचालकाच्या साह्याने त्याला धरून ठेवले आणि फरपटतच पोलीस ठाण्यात नेले. त्यासाठी आपल्या कराटेच्या अनुभवांचावापर करून त्याला चांगलेचपंचेसही दिले.तिथे त्याच्याविषयी तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी ती लिहून घेण्यास नकार दिला. तोपर्यंत तरुणीने आपल्या वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. (वृत्तसंस्था)अधीक्षकांमुळेच झाली कारवाईपोलीस तक्रार लिहून घ्यायला तयार नसल्याचे पाहून कराटेपटू तरुणी व तिच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक पंकज नैन यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर मात्र तक्रार लिहून घेण्यात आली.वाहतूक पोलिसांला निलंबित व अटक करण्याचेही आदेश त्यांनी लगेच दिले.
कराटेपटू तरुणीला छेडणे पोलिसाला पडले महाग; नोकरीतून केले निलंबित, अटकही झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:15 AM