नवी दिल्ली - आई-बाबा होणं हा प्रत्येक पालकाच्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. काही लोकांना जुळी मुलं होतात. तर काहींना मुलासाठी लग्नानंतर देखील कित्येक वर्षे वाट पाहावी लागते. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. राजस्थानमध्ये नियतीचा क्रूर खेळ पाहायला मिळाला आहे. लग्नाच्या 7 वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आई झाली. तिने तब्बल 5 बाळांना एकाच वेळी जन्म दिला. पण पाचपैकी एकही बाळ जिवंत राहिलं नसल्याची घटना आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करौलीच्या मासलपूरमधील पिपरानी गावातील रेश्मा नावाच्या महिलेला लग्नाला सात वर्षे झाले तरी मूल होत नव्हतं. अखेर 7 वर्षांनी ती प्रेग्नंट राहिली. करौलीतील एका खासगी रुग्णालयात तिची डिलीव्हरी झाली. प्रसूतीच्या कालावधीआधीच तिची प्रसूती झाली. तिने एकाच वेळी तब्बल पाच मुलांना जन्म दिला. यामध्ये दोन मुलं आणि तीन मुली होत्या. इतक्या वर्षांनी कुटुंबात बाळाचा जन्म झाल्याने नातेवाईक आनंदात होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
प्रिमॅच्युअर बेबी असल्याने सर्वच मुलं खूप कमजोर होती. त्यांचं वजन 300 ते 660 ग्रॅमच होतं. त्यांचं वजन पाहता त्यांची जगण्याची शक्यता कमीच होती. पण त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांना जयपूर पाठवलं पण त्यांचा मृत्य़ू झाला. यामुळे रेश्मा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.