लडाखमधील द्रास, कागरिलमध्ये शुक्रवारी एक संदिग्ध स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले. हा स्फोट कारगिलमधील कबाडी नाला परिसरामध्ये झाला. आता पोलीस या स्फोटाबाबत तपास करत आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संदिग्ध स्फोट कारगिल जिल्ह्यातील एका भंगाराच्या दुकानामध्ये झाला. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. द्रासमधील कबाडी नाला परिसरामध्ये भंगाराच्या दुकानात एका संशयास्पद वस्तूचा स्फोट झाला. एका बाहेरील व्यक्तीसह दोघांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१९९९ मध्ये कारगिल युद्ध हे याच भागात झाले होते. त्यामुळे हा भाग संवेदनशील मानला जातो. मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्याचे उघड होताच या युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने पराक्रमाची शर्थ करत विजय मिळवला होता. कारगिलमधील घुसखोरीची पूर्वतयारी पाकिस्तानने आधीपासूनच केली होती. त्यासाठी १९९८ मध्ये पाकिस्तानने एका ब्रिगेडियरला कारगिल भागात टेहळणीसाठी पाठवले होते. त्यानंतर आखलेल्या योजनेनुसार घुसखोरी करण्यात आली होती. मात्र अखेरीस पाकिस्तानचा पराभव झाला होता.