आज कारगिल युद्धात भारतील लष्कराने मिळवलेल्या विजयाला २४ वर्षे पूर्ण झाली आहे. या युद्धामध्ये अनेक तरुण जवानांनी पाकिस्तानी आक्रमणाविरोधात पराक्रमाची शर्थ करत भारतमातेचं संरक्षण केलं होतं. या लढाईत भारताच्या अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. यामध्ये एक नाव होतं कॅप्टन विक्रम बत्रा. जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव डिंपल चिमा असं होतं. कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा यांची भेट १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात झाली होती. ही त्यांची पहिली भेट होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. मात्र काहीच दिवसांतच विक्रम बत्रा यांना डेहराडून येथे असलेल्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला. त्यामुळे ते प्रशिक्षणासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत विक्रम आणि डिंपल यांच्यातील प्रेम बहरले होते.
विक्रम बत्रा लष्करी प्रशिक्षण घेत असताना डिंपल त्यांची वाट पाहत होत्या. इकडे डिंपल यांच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नासाठी तगादा सुरू केला होता. मात्र डिंपल यांना केवळ विक्रम बत्रा यांच्याशीच लग्न करायचं होतं. कुटुंबीयांचा लग्नासाठी दबाब वाढवल्यावर अखेर डिंपल यांनी विक्रम बत्रांकडे लग्नाचा विषय काढला. तेव्हा विक्रम यांनी पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला आणि त्या रक्तानं डिंपलची भांग भरली.
विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतानाच तिकडे सीमेवर कारगिलमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली आणि युद्धाला तोंड फुटलं. त्यामुळे विक्रम बत्रा यांना युद्धासाठी रवाना झाले. कारगिलमध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. मात्र पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. विक्रम यांच्या अकाली जाण्याने डिंपल यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांचं प्रेम कायम होतं. त्यामुळे त्यांनी विक्रम बत्रा यांच्या आठवणीमध्ये कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
डिंपल चीमा सध्या एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहेत. तसेच विक्रम बत्रा यांच्या आठवणीमध्ये जीवन जगत आहेत. आपलं विक्रम बत्रा यांच्यावर प्रेम आहे, असं त्या अभिनामाने सांगतात. विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा यांची ही प्रेमकहाणी शेरशाह या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली होती.