श्रीनगरच्या लाल चौकात आज भाजपाच्या युवा मोर्चाने तिरंगा यात्रा काढली होती. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा फडकत होता. या यात्रेचे नेतृत्व बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाल चौकातील तीस वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल होत आहे.
जेव्हा मोदी गेलेले तेव्हा त्यांना फुटीरतावाद्यांनी धमकी दिली होती. तरी देखील मोदींनी तिथे जात तिरंगा फडकविला होता. तेजस्वी सूर्या यांनी त्यावेळचा फोटो पोस्ट केला आहे. काही वर्षांपूर्वी लाल चौक देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांच्या भावनांनी भारलेला होता. तिथे जो कोणी तिरंगा फडकवेल त्याला ठार मारण्याची धमकी या दहशतवाद्यांनी दिली होती. मोदींनी १९९२ मध्ये इथेच तरंगा फडकविला होता. यामुळे आज आम्ही पुन्हा तिरंगा तिथे फडकवू शकलो, असे सूर्या यांनी कॅप्शन दिले आहे.
तेव्हा तिरंगा फडकवितानाचा मोदींचा फोटो काही व्हायरल झाला नव्हता. तिथे जाण्यापूर्वी मोदी यांनी जोरदार भाषण दिले होते. हातात तिरंगा घेऊन मी श्रीनगरच्या लाल चौकात येईन, तेव्हाच कोणी आपल्या मातेचे दूध पिलेय याचा निर्णय होईल, असा इशारा मोदींनी दहशतवाद्यांना दिला होता.
तेच मोदी आज देशाचे पंतप्रधान झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. तेथील वातावरणही बदलले आहे. या बदललेल्या वातावरणातच मोठा राजकीय संदेश देण्यासाठी भाजपने सोमवारी बाईक रॅली काढली. 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी 100 बाईकवर श्रीनगर ते कारगिल अशी तिरंगायात्रा देखील काढली.