कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) यानिमित्त शहीद कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांचे अनोख्या पद्धतीने स्मरण करण्यात आले. केरळमधील एका कलाकाराने विक्रम बत्रा यांचे पाण्याखाली चित्र बनवले आहे. यासाठी या कलाकाराचे नावही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे अंडरवॉटर पोर्ट्रेट केरळमधील कलाकार दा विंची सुरेश (Da Vinci Suresh) यांनी बनवले आहे. यादरम्यान तिरुअनंतपुरममध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला जात होता.
हा कार्यक्रम भारतीय लष्कराने आयोजित केला होता. Pangode Military Station वर झालेल्या या कार्यक्रमात Bond Water Sports Pvt Ltd च्या स्कूबा टीमने लष्कराला सहकार्य केले.
शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे पोर्ट्रेट 50 फूट लांब आणि 30 फूट रुंद आहे. Universal Records Forum मध्ये याला स्थान मिळाले आहे. URF च्या टीमने घटनास्थळीच दा विंची सुरेश यांना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
विक्रम बत्रा यांचे पाण्याखाली चित्र काढण्यासाठी दा विंची सुरेश यांना 8 तास लागले. हे चित्र टाइल्सच्या साहाय्याने तयार करण्यात आले होते. दा विंची सुरेश म्हणाले, 'संपूर्ण काम पाण्याखाली करण्यात आले होते, ज्यामुळे ते अधिक खास होते. हा माझा पहिलाच अनुभव होता, मला खूप मजा आली.'
दरम्यान, कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले होते. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. 3 मे 1999 रोजी युद्ध सुरू झाले. या लढाईला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. या युद्धात पाकिस्तानशी लढताना 527 भारतीय जवान शहीद झाले होते.