नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारतानेपाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात भारताच्या वीर जवानांनी पराक्रमाची शर्थ करून पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी केलेले आक्रमण परतवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. लेफ्टिनंट जनरल ए.एन. औल आणि कर्नल अमित औल अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल औल 56 माऊंटन ब्रिगेडचे कमांडर होते. या ब्रिगेडनेच द्रास विभागातील सामरिक दृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या टायगर हिल या शिखरावर कब्जा केला होता. आता लेफ्टनंट जनरल औल वेस्टर्न कमांडचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदापर्यंत पोहोचून निवृत्त झाले आहेत.
लेफ्टिनंट जनरल औल कारगिल युद्धावेळी ब्रिगेडियर होते. तसेच 56 मी माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. या ब्रिगेडने तोलोलिंग आणि टायगर हिलवर विजय मिळवला होता. त्यावेळी अमित औल हे 3/3 गोरखा रायफल्समध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर कार्यरत होते. आमित मारपो ला परिसरात तैनात होते. आता औल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथे राहते. तसेच औल पिता-पुत्रांना त्यांच्या शौर्यासाठी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जनरल औल यांना उत्तम युद्ध सेवा मेडल आणि आणि अमित औल यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अमित औल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना '' युद्ध सुरू असताना मी आईला सर्व गोष्टी सांगू नसेत, असा सल्ला वडिलांनी दिला होता. तू एक सैनिक आहेस आणि युद्धासाठीच बनला आहेस, असे ते म्हणाले होते. दरम्यान, कारगिल युद्ध सुरू असताना मी माझ्या वडिलांशी एकदाही संपर्क केला नव्हता. तसेच युद्ध संपल्यावर सुमारे दोन महिन्यांनंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो'' असं म्हटलं होतं. पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.
'जरा याद करो कुर्बानी', कारगिल युद्धात 527 जवानांनी दिले बलिदान
16 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला. या युद्धावेळी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आपण पाहिले. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने प्रयत्न करत होता. अडीच महिने सुरु असलेल्या या युद्धात भारताने 527 भूमीपुत्रांना गमावले तर 1300 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. विशेष म्हणजे या युद्धात ज्यांना वीरमरण आले, त्यापैकी बहुतांश जवानांनी वयाची तिशीही पार केली नव्हती. आयुष्यातील उमेदीच्या काळातच या भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान दिलं. या शहिदांना शौर्य आणि बलिदानाचे प्रतिक उभारले. आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा जवानांनी देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे.