भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील छत्तीसचा आकडा जगाला माहीत आहे. भारतानेपाकिस्तानला 'टाळी' देण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचे कांगावे आणि कुरापतींमुळे ही मैत्री होऊ शकलेली नाही. उलट, काश्मीरवर पाकिस्तानने हक्क दाखविला आणि नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया केल्या, यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. त्याच अनुषंगाने, कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्ताने या युद्धाचा इतिहास आणि कारणे जाणून घेऊ या.....
भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट उधळून लावले. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'.
कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तेथील तापमान उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस इतके असते. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झाले नव्हते. या युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानाने तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले.