नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे. आज मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान 'मिराज2000' विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. 'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला कारगिल युद्धात धडा शिकवणाऱ्या बी. एस. धनोआ यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करणं धाडसाचं मानलं जातं. मात्र हवाई दलाचे प्रमुख असलेल्या धनोआ यांना अशा कारवाईचा अनुभव आहे. कारगिल युद्धावेळी विंग कमांडर असलेल्या धनोआ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हाती. त्यावेळी त्यांनी लढाऊ विमानांच्या तुकडीचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली होती.
पाकिस्तानकडे एफ-16 ही अत्याधुनिक विमानं असताना, त्यांच्याकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता असतानाही भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरने धडाकेबाज कारवाई केली. रात्रीच्या वेळी अशा कारवाया करणं आव्हानात्मक असतं. मात्र तरीही हवाई दलाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली.
भारताची 'मिराज2000' विमानं बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमध्ये कारवाई करत असताना पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय हवाई दलाने कारवाई पूर्ण केली. कारगिलवेळी केलेल्या कारवाईचा अनुभव यावेळी धनोआ यांना कामी आला. 'जेव्हा तुम्हाला कारवाईची संधी मिळते, तेव्हा तुम्ही पूर्णपणे सज्ज असावं लागतं. तुम्ही आयुष्यभर या संधीची वाट पाहत असता. ज्यावेळी अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा तो स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो,' असं धनोआ यांनी कारगिलच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं होतं.