पाटणा - बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून पुढील निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात येत आहे. तर, भाजपाकडूनही बिहार राज्यातील मजुरांना लक्ष्य ठेऊन निवडणुकींसाठी तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता, निवडणुकांपूर्वीच राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजकारणातील मास्टर स्ट्रोक लगावला आहे. तेजस्वीने राजद पक्षात ऐश्वर्या रायची चुलत बहिणी करिश्माची एंट्री करुन घेतली आहे.
तेजस्वी यादवने आपल्या मोठ्या भावाची पत्नी ऐश्वर्या यांच्या चुलत बहिणीचा राष्ट्रीय जनात पक्षात प्रवेश करुन घेतला. मात्र, यासंदर्भात तेज प्रताप यादवला काहीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेजप्रताप यांनी यासंदर्भात नाराजी दर्शवली आहे. चालू वर्षाच्या अखेरच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता दल युनायटेडकडून ऐश्वर्या रायला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ऐश्वर्या विरोधात करिश्माला उतरवरुन राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न तेजस्वी यांचा असणार आहे.
करिश्मा राय या राजदचे नेते तेज प्रताप यादव यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांची चुलत बहिण आहे. करिश्मा या ऐश्वर्याचे वडिल आणि राजदचे आमदार चंद्रिका राय यांच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. दरम्यान, तेप प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांच्यातील वैवाहिक संबंधात बिघाड झाल्यानंतर ऐश्वर्याने आपल्या वडिलांची घरची वाट धरली आहे. तसेच, याप्रकरणी न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. तसेच, चंद्रिका राय यांनीही राजद पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासोबतचे संबंध तोडले आहेत.
करिश्मा यांच्या पक्ष प्रवेशावर ऐश्वर्याचे पती आणि पक्षाचे नेते तेज प्रताप यांनी नाराजी दर्शवली आहे. याप्रकरणी मला काहीही विचारपूस करण्यात आली नाही. ज्या चंद्रिका राय यांच्या कुटुंबाविरुद्ध मी न्यायालयात खटला लढत आहे, त्या कुटुंबातील सदस्यांशी आम्ही कुठलेच संबंध ठेऊ इच्छित नाही, असे तेज प्रताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे, करिश्मावरुन दोन भावांत राजकीय वाद जुंपणार असल्याचे दिसून येत आहे.