चंद्रकांत कित्तुरेहुबळी : मला आता कोणतीही राजकीय आकांक्षा राहिलेली नाही. विधानसभेत निरोपाचे भाषण करून सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा तेवढीच इच्छा होती. पक्षाला ती कळविली होती. मात्र, उमेदवारी नाकारून भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले. हा आत्मसन्मान कायम राखण्यासाठीच काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
सहावेळा आमदारपद भूषविणारे शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हुबळी येथील आपल्या निवासस्थानालाच त्यांनी कार्यालयाचे स्वरूप दिले आहे. हुबळीत १९९४ पासून मी आमदार आहे. भाजपला मीच येथे उभे केले आहे. हुबळीसह जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. माझ्याविरोधात नागरिकांत अजिबात असंतोष नाही त्यामुळे मला येथे काहीच अडचण नाही.
काँग्रेस मानवतावादी विचारांचा पक्षआपली संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्ये गेली आहे. वैचारिकदृष्ट्याही काँग्रेस आणि भाजप वेगळे आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून लढताना, भाजपच्या मतदारांना सामोरे जाताना अडचण होत नाही का, या प्रश्नावर शेट्टर म्हणाले, काँग्रेस हा मानवतावादी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. मतदारांचे म्हणाल तर सुरुवातीला थोडे अडचणीचे वाटले; पण कार्यकर्ते आणि नागरिकांना मी काय आहे हे माहीत असल्याने त्यांनीही मला समजून घेतले आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
त्यांच्याबद्दल आदरच...कार्यालयात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो असल्याबद्दल जगदीश शेट्टर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच.