श्रीनिवास नागेअथणी (जि. बेळगाव) : अख्ख्या कर्नाटकातील भाजपच्या निशाण्यावर असलेल्या अथणी मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचे कमळ बाजूला सारून काँग्रेसचा ‘हात’ हातात घेऊन शड्डू ठोकला आहे. ‘हिंमत असेल तर मला पाडून दाखवा’ असे आव्हान त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याशी त्यांची काट्याची लढत होत आहे.
संपूर्ण कर्नाटक राज्याला नेत्यांचे पक्षांतर नवीन नाही. २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तेव्हाच्या भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांना केवळ २००० मतांनी अस्मान दाखविले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेसच्या १७ आमदारांना फोडले.
त्याचवेळी या १७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या दरम्यान २०१८ मधील पराभवानंतर सवदी यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविले होते, परंतु ते आता विधानसभेची उमेदवारी मागत होते. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सवदींनी काँग्रेस गाठून तिकीट मिळवले. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याने संपूर्ण राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी अथणी मतदारसंघ लक्ष्य केला आहे.
पाण्याचे राजकारणबेळगाव जिल्ह्याचे राजकारण जेथे शिजते, त्या अथणी मतदारसंघातील सिंचनाअभावी कोरडा राहिलेला भाग ४० टक्के आहे. महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीचे पात्र फेब्रुवारी ते मे यादरम्यान कोरडे पडलेलेे असते तेव्हा कोयना धरणातून चार टीएमसी कर्नाटकसाठी सोडावे, त्यासाठी लागणारी रक्कम भरण्याची तयारी आहे, असे कर्नाटक सांगते. दुसरीकडे कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागाला पाणी द्यावे, असा प्रस्ताव आहे, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. परिणामी दरवर्षी अथणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडेबेळगाव जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. जिल्हा विस्ताराने खूप मोठा आहे. अथणीपासून बेळगावचे अंतर दीडशे किलोमीटर आहे. त्यामुळे अथणी मतदारसंघाचे जवळच्या सांगलीशी बाजारपेठ, पै-पाहुणे या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी आहे. परंतु राजकारणात हे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.