बंगळुरू - गुणवत्तेच्या तुलनेने कर्नाटकचे नंदिनी हा गुजरातच्या अमूल इतकाच चांगला ब्रँड आहे. त्यासाठी नंदिनीच्या व्यवसायात अमूलला हस्तक्षेप करू देणार नाही. मी मुख्यमंत्री झालो तर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन याप्रकारे विधान काँग्रेस नेते सिद्धारमैया यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, गुजरातची डेअरी अमूल आणि कर्नाटकची नंदिनी हे कुठल्याही प्रकारे विलिनीकरण होणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन. अमूलला सध्या त्यांच्या ग्राहकांना टिकवायला हवे. कर्नाटकात घुसून ते येथीस स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही अमूलला इथं विरोध करणार. मी लोकांना अमूलचं दूध खरेदी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री बनल्यावर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
कर्नाटकात त्रिशंकु नव्हे तर काँग्रेस एकहाती जिंकणार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भविष्यवाणी करत सिद्धारमैया म्हणाले की, आगामी निवडणुकीत काँग्रेसला १३० हून अधिक जागा मिळतील. मागच्यावेळीसारखे त्रिशंकु परिस्थिती उद्भवणार नाही. कारण कर्नाटकात एकाच पक्षाचे सरकार असावे ही जनतेची इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे यावेळी आम्ही जिंकणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुका माझ्यासाठी शेवटच्या असतील. जर मी मुख्यमंत्री बनलो नाही तरी मी पुढील निवडणूक लढणार नाही अशी घोषणाच सिद्धारमैया यांनी केली.
दरम्यान, १५ व्या वित्त आयोगाने कर्नाटकला ५४९५ कोटी रुपये विशेष अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यामुळे हा रिपोर्ट दुर्लक्ष केला. त्यासाठी कोण जबाबदार आहे? राज्यात दरवर्षी ४ लाख कोटीपेक्षा जास्त महसूल जमा होतो. परंतु राज्याला केवळ ५० हजार कोटी दिले जातात. सध्याच्या सरकारने राज्यासाठी काय केले? असा सवालही सिद्धारमैया यांनी विचारला.