श्रीनिवास नागेविजयपूर : मुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वक्कलिग समाजांना प्रत्येकी दोन टक्के आरक्षण वाढ, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबवण्याची घोषणा यातून भाजपने कर्नाटकात हिंदुत्ववादी मतांना पुन्हा चुचकारले आहे. त्यामुळे लिंगायत आणि वक्कलिग समाजाभोवती फिरणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे.
कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे ५० टक्के खासदार आणि आमदार या दोन जातींचेच राहिले आहेत. पक्ष कोणताही असो, उमेदवारी देताना जातीय समीकरणे मांडून या दोन्ही जातींना प्राधान्य दिले जाते.
...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्काकर्नाटक निवडणुकीत जर भाजपचा पराभव झाला तर हा “हिंदुत्ववादी शक्तींना” मोठा धक्का असेल. यामुळे विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी मोठी मदत मिळेल, असे माकपाने म्हटले आहे. भाजपला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा फटका बसत आहे. यामुळेच भाजपने ‘विभाजनाचा अजेंडा’ पुढे ढकलण्यास सुरुवात केली, असे माकपने आपल्या ‘पीपल्स डेमोक्रसी’ या मुखपत्रात म्हटले आहे.
हिंदूविरोधकांचा ‘एन्काउंटर’ करू!भाजपचे ‘फायरब्रँड’ नेते बसनगौडा पाटील- यतनाळ यांनी तर राज्यातील हिंदूविरोधक आणि राष्ट्रविरोधकांना मारले जाईल, अशी थेट धमकी दिली आहे. हिंदू धर्माच्या विरोधकांचा ‘एन्काउंटर’मध्ये खात्मा करू, असे यतनाळ म्हणतात. भाजपचे आमदार बसनगौडा पाटील- यतनाळ १९९४ पासून आमदार- खासदार आहेत. वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते. मुस्लीमबहुल विजयपूरमध्ये त्यांनी मुस्लीमविरोधी ‘अजेंडा’ राबवला आहे.