Karnatak Election: बसवराज बोम्मईंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नव्या नावाची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:02 AM2023-05-14T11:02:28+5:302023-05-14T11:04:09+5:30
Karnatak Election: कर्नाटकातील पराभवामुळे भापजला दक्षिण द्वार बंद झाले असून दक्षिण भारतातील एकही राज्यात आता भाजपची सत्ता नाही.
बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालं असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शहा, राजनाथसिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गजांची फौज कर्नाटकच्या मैदानात प्रचारासाठी उतरली होती. तरीही, भाजपला कर्नाटकात मोठा पराभव पत्कारावा लागला. येथील पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपण स्विकारत असल्याचे कर्नाटक भाजप नेते आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले. त्यानंतर, त्यांनी शनिवारी रात्रीच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यामुळे, आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? याची चर्चा रंगली आहे.
कर्नाटकातील पराभवामुळे भापजला दक्षिण द्वार बंद झाले असून दक्षिण भारतातील एकही राज्यात आता भाजपची सत्ता नाही. येथील विधानसभेच्या २२४ जागांवरील निवडणुकांत भाजपला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. काँग्रसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. त्यामुळे, बसवराज बोम्मई यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्विकारला. यावेळी, आम्ही जनतेचा कौल नम्रपणे स्विकारतो. यावेळी, भाजपला ३६ टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली. पण, बहुतांश जागांवर आमचा पराभव झाला. त्यामुळे, पराभव हा पराभव असतो, असे म्हणत बसवराज बोम्मई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, काँग्रेसने स्पष्ट बहुमताचा आकडा सहजच गाठल्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचा नेमका चेहरा कोण असणार याची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांना खुर्ची मिळणार की, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यापूर्वी २०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या कालावधीत सिद्धरमैय्या यांनी येथील मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे, आता रविवारी काँग्रेसच्या आमदार गटाची बैठक झाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. आज सायंकाळी बैठक होत असून त्यात नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत ११३ हा बहुमता आकडा सहजच पार केला आहे. त्यामुळे, १० वर्षांनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमताने कर्नाटकात सरकार स्थापन करता आले. तर, यंदाचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.