अमित शाहांची भविष्यवाणी खरी ठरली, पण जगदीश शेट्टार यांची रणनीती BJP वर भारी पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 02:26 PM2023-05-13T14:26:45+5:302023-05-13T14:27:14+5:30
Karnatak Election Result Live: जगदीश शेट्टार यांना २९ हजार ३४० मते मिळाली तर महेश तेंगिनाकाई यांना ६४ हजार ९१० मते मिळाली आहेत. जवळपास ३५ हजाराहून अधिक मते भाजपा उमेदवाराला मिळाली आहेत.
बंगळुरू - कर्नाटकच्या हुबली धारवाड मध्य मतदारसंघातून भाजपातूनकाँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार हे पराभवाच्या छायेत आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शेट्टार यांच्या बंडखोरीमुळे भाजपाने या जागेवर महेश तेंगिनाकाई यांना मैदानात उतरवले होते. त्यानंतर सर्वांचे लक्ष हुबली धारवाड या मतदारसंघावर लागून होते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जगदीश शेट्टार यांना २९ हजार ३४० मते मिळाली तर महेश तेंगिनाकाई यांना ६४ हजार ९१० मते मिळाली आहेत. जवळपास ३५ हजाराहून अधिक मते भाजपा उमेदवाराला मिळाली आहेत. शेट्टार हे येडियुरप्पा यांच्यानंतर दुसऱ्या नंबरचे लिंगायत समाजाचे नेते आहेत. काँग्रेसचा हात पकडल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेले जगदीश शेट्टार यांच्या बंडखोरीमुळे त्यांनाच फटका बसल्याचे निकालातून स्पष्ट दिसून येते. परंतु शेट्टार यांचा पराभव होऊनही ते काँग्रेससाठी बाजीगर ठरलेत. शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने बहुतांश विधानसभेत लिंगायत समाजाने काँग्रेसला मतदान केले.
भाजपा नेते आणि लिंगायत समाजाचा चेहरा असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं की, जगदीश शेट्टार यांच्यामुळे भाजपाला २०-२५ जागांचा फटका बसू शकतो. त्याचाच प्रत्यत आजच्या निकालात आला. कारण येडियुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजाचे नेते म्हणून जगदीश शेट्टार यांच्याकडे पाहिले जाते.
तिकीट न मिळाल्याने होते नाराज
भाजपाने वयाचा फॅक्टर लक्षात घेता शेट्टार यांना तिकीट नाकारले. विद्यमान आमदार असतानाही तिकीट नाकारल्याने जगदीश शेट्टार नाराज झाले. भाजपाच्या दुसऱ्या यादीत नाव न आल्याने शेट्टार यांनी भाजपाला खडेबोल सुनावत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार हा निश्चय त्यांनी केला होता. भाजपाने शेट्टार यांना तिकीट देऊ असं आश्वासन देऊनही ते पूर्ण केले नाही त्यामुळे शेट्टार नाराज झाले.
काय म्हणाले होते अमित शाह?
जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण हुबली धारवाड मध्य मतदारसंघ हा कायम भाजपाच्या पाठिशी राहिला आहे. तिथे भाजपाचा पराभव होणार नाही. भाजपा कार्यकर्ते एकजूट आहेत, शेट्टार यांचा पराभव होईल असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटलं होते.