बंगळुरू: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. कर्नाटकातील अनेक शाळा आणि कॉलेजात मुस्लिम आणि हिंदू विद्यार्थी आमनेसामने आल्याच्या प्रकरणावर अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. आता लालू प्रसाद यादव यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मीडियाशी संवाद साधताना लालू प्रसाद यादव यांनी देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. लालू यांच्यापूर्वी प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मुद्द्यावर विविध राज्यांतील राजकारणी विभागलेले दिसत आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणावरुन विविध पक्षांचे राजकारणीही यावर आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली-मुंबईतही या घटनेचे पडसाद उमटत असून, आंदोलने होत आहेत.
दरम्यान, यावर प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवेसी, मोहसीन रझा, केशव मौर्य, व्हीके सिंग आदी नेत्यांची वक्तव्येही आली आहेत. प्रियंका गांधी हिजाबबाबत मुस्लिम मुलींच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. कोणते कपडे घालायचे, हा मुलींना संविधानाने अधिकार दिल्याचे मत प्रियंकांनी बोलून दाखवले. तर, द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप ओवेसींनी केला. दुसरीकडे भाजपने कायदा आणि ड्रेस कोडचा हवाला देत हिजाबला चुकीचे म्हटले आहे.
काय आहे हिजाबचा वाद?कर्नाटक सरकारने राज्यात कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चे कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निश्चित गणवेश परिधान केला जाईल, खासगी शाळांनाही स्वतःचा गणवेश निवडता येईल.
हिजाबचा हा वाद गेल्या महिन्यात जानेवारीत सुरू झाला. उडुपीतील एका सरकारी कॉलेजमध्ये 6 विद्यार्थिनींनी हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश केला. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु मुलींनी तो परिधान केला. यानंतर हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाबविरोधात भगवे गमछे घालून कॉलेजात प्रवेश केला. हा वाद हळुहळू इतर कॉलेजांमध्येही पसरला.
कर्नाटकात शाळा बंदमुस्लिम विद्यार्थी हिजाब बंदीच्या विरोधात निदर्शने करत आहेत, तर अनेक हिंदू विद्यार्थी भगवे गमछे परिधान करून कॅम्पसमध्ये घोषणा देत आहेत. मंगळवारी परिस्थिती आणखी बिघडली होती, या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 3 दिवसांसाठी बंद ठेवली आहेत.