कर्नाटक - कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
''भाजपाकडून जेडीएस पार्टीतील एका व्यक्तीला 60 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीनं भाजपाची ऑफर नाकारली'', असा दावा गौडा यांनी केला आहे. कर्नाटकातील हस्सान येथे पत्रकार परिषद घेऊन गौडा यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
केएम शिवलिंगे गौडा यांनी सांगितले की, ''जेडीएसमधील एका व्यक्तीला माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते जगदीश शेट्टार यांनी 60 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती. संबंधित व्यक्तीनं भाजपाची ऑफर नाकारली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना ऑफरबाबतची माहिती दिली''. गौडा यांनी केलेल्या दाव्यावर कर्नाटकात आता नवीन नाट्य घडण्याची चिन्हं आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस-जेडीएसचे सरकार उलथवण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसच्या 12 ते 15 आमदारांना राजीनामे द्यायला लावण्याचा डाव भाजपानं आखला होता. मात्र भाजपाचा हा डाव फसला. या पार्श्वभूमीवर, दोहोंकडून आपापले आमदार फुटू नयेत, यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाहीय. भाजपानं गेल्या काही दिवसांपासून आपल्या आमदारांना हरियाणातल्या गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते.
याशिवाय काँग्रेसच्या चार आमदारांना मुंबईत ठेवण्यात आले होते. मात्र सरकार पाडण्यासाठी जेवढ्या आमदारांची आवश्यकता आहे, तितके आमदार राजीनामा देण्यास तयार नसल्याची जाणीव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना झाली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांना ऑपरेशन लोटस स्थगित करत असल्याची माहिती दिली.
'एकाच वेळी काँग्रेस, जेडीएसच्या कमीत कमी 16 आमदारांनी राजीनामे द्यायला हवेत, असं पक्ष नेतृत्त्वानं म्हटलं होतं. त्यानुसार शनिवारपर्यंत काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पक्ष सोडण्यास नकार दिला,' असं येडियुरप्पा यांनी हॉटेलमध्ये असलेल्या भाजपाच्या आमदारांना सांगितल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
दरम्यान, 15 जानेवारीला कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारचा दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. त्यातील एक आमदार भाजपाची पाठराखण करणार आहे. मात्र सरकार स्थिर असल्याचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केला आहे.एच. नागेश व आर. शंकर अशी त्या आमदारांची नावे आहेत. सध्याच्या आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे एच. नागेश यांनी ठरविले आहे. मी कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबा काढला असे आर. शंकर म्हणाले.