बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्याचवेळी हावेरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपा उमेदवार शिवराज सज्जन यांच्या घरात साप शिरला, बैठक सुरू असताना साप पाहून गोंधळ माजला. विशेष म्हणजे याठिकाणी बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील उपस्थित होते. भाजपा नेत्यांसोबत सज्जन यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती. सापाला पाहून तातडीने सर्पमित्राला पाचारण करून सुरक्षितपणे सापाला बाहेर काढले.
कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसतेय. काँग्रेस ११५, भाजपा ७९ जागांवर आघाडीवर आहे तर जेडीएसही २६ जागांवर पुढे आहे. १० मे रोजी कर्नाटकात २२४ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपाला टार्गेट केले तर विकास आणि त्यानंतर बजरंगबली प्रकरणावरून भाजपाने काँग्रेसला घेरले होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्याच्यासमोर काँग्रेसचे यासिर अहमद खान पठाण निवडणूक लढवत आहे. या जागेवर सर्वांचे लक्ष आहे. सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री बोम्मई या जागेवर आघाडीवर आहेत.