मुंबई - कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून आता २२४ जागांपैकी स्पष्ट बहुमताचा आकडा गाठल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात असून भाजपनेही पराभव मान्य केला आहे. या पराभवामुळे भाजपचे दक्षिणद्वार बंद झाल्याचे दिसून येते. कारण, दक्षिण भारतातील एकही राज्य आता भाजपच्या सत्ताकेंद्रात नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने ११३ जागांचा बहुमताचा आकडा पार केल्याचं मानलं जात आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया देत हा विजय काँग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे म्हटले. यावेळी, वरिष्ठ नेतृत्त्वाबद्दल बोलताना ते भावूक झाल्याच पाहायला मिळालं.
डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तर, पक्ष नेतृत्त्वाबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनिया गांधी यांनी २०२० मध्ये तिहार जेलमध्ये माझी भेट घेतली, त्यावेळी, मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने मला अटक केली होती, असे सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मला कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, असेही शिवकुमार यांनी म्हटले. तर, यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आठवणही त्यांनी करुन दिली.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता विविध देशभरात उमटू लागले आहेत. देशभरातून काँग्रेसच्या विजयाबद्दल कर्नाटक काँग्रेस आणि नेतृत्तवाचं अभिनंदन करण्यात येत आहे. तर, काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ते कर्नाटकच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. या निवडणुकीच्या निकालावरून भाजपाचं ऑपरेशन लोटस, तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला आहे. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला लक्ष्य करत मोदी-शहांवर निशाणा साधला आहे.