बंगळुरू - Prajwal Revanna return to India ( Marathi News ) कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रज्वल रेवन्ना हा फरार होता. कर्नाटकात सेक्स स्कँडल प्रकरण उघड होताच देशभरात हा मुद्दा गाजला. तेव्हापासून प्रज्वल रेवन्ना हा गायब झाला असून तो परदेशात पळून गेल्याचं बोललं जात होतं. ऐन निवडणुकीत समोर आलेल्या या सेक्स स्कँडलनं कर्नाटकात खळबळ माजली होती.
आता आरोपी प्रज्वल रेवन्नाने एक निवेदन जारी करत म्हटलंय की, माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलं. त्यामुळे मी मानसिक तणावाखाली होतो. माझ्याविरोधात काही शक्ती काम करत होती. कारण मी राजकारणात पुढे चाललो होतो. ३१ तारखेला सकाळी १० वाजता मी SIT समोर हजर राहून चौकशीला सहकार्य करेन. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्याविरोधात खोटा आरोप केला जात असून कायद्यावर माझा भरवसा आहे असं त्याने सांगितले.
तसेच परदेशात मी कुठे आहे याची माहिती न दिल्याबद्दल मी कुटुंबातील सदस्यांची, कुमारन्ना आणि पक्षातील कार्यकर्त्यांची माफी मागतो. २६ तारखेला जेव्हा निवडणूक संपली तोपर्यंत माझ्याविरोधात कुठलाही खटला नव्हता. SIT ही गठीत झाली नव्हती. मी गेल्यानंतर २-३ दिवसांनी युट्यूबवर माझ्यावरील आरोप पाहिले. मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून SIT ला पत्र लिहून ७ दिवसांची मुदत मागितली होती असं प्रज्वल रेवन्ना याने म्हटलं.
आजोबा देवेगौडांचा इशारा
सेक्स स्कँडलमुळे चर्चेत आलेल्या प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांनीही पत्र लिहून इशारा दिला होता. देवेगौडा यांनी प्रज्वल रेवन्ना याला लवकरात लवकर भारतात परतण्याचा इशारा दिला. देवेगौडांनी X वर पोस्ट करून लिहिलं होतं की, "मी प्रज्वल रेवण्णाला इशारा देतो, तो जिथे कुठे असेल, तिथून त्याने लवकरात लवकर भारतात परत यावे आणि येथील कायदेशीर प्रक्रिया सामोरे जावे. त्याने माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये" देवेगौडांनी प्रज्वलला माय वॉर्निंग नावाचे दोन पानी पत्रही लिहिलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी केली होती पासपोर्ट रद्द करण्याची मागणी
मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी प्रज्वल रेवन्नाचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी केली. रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरण समोर येताच, त्याच्याविरोधात पहिला गुन्हा रद्द होण्याआधीच देश सोडून बाहेर निघून गेला. नियमानुसार, खासगी प्रवासासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर करण्यासाठी परवानगी घेणं गरजेचे असते. मात्र कुठलाही व्हिसा नोट जारी न हाता रेवन्ना बाहेर गेला असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.