बंगळुरू - कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे.
या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत.
या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासाठी मी दुखी आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवायला हवे होते कारण ते मेहनती आहेत. लोकांवर प्रेम करतात आणि कायम त्यांना मदत करतात त्यांना तुम्ही मंत्री बनवायला हवे अशी मागणी तिने पत्रात केली. आरना ही तिसरीच्या वर्गात शिकते. जयचंद्र यांचा दुसरा मुलगा संदीप टीजे यांची ती मुलगी आहे. टीव्हीवर जेव्हा कळालं, माझ्या आजोबांना मंत्री बनवणार नाहीत तेव्हा मी ते पाहून खूप रडले असंही तिने म्हटलं आहे.
टीबी जयचंद्र मंत्रिपदापासून वंचित२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव वाढत असताना पक्षाने विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. शनिवारी २४ नवीन मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळ विस्ताराची कसरत पूर्ण झाली. जयचंद्र मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिले. त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कर्नाटकात अनेक आमदार नाराजकर्नाटक राजभवनात शनिवारी २४ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. ज्यात अनेक वरिष्ठ आमदारांचे नाव नव्हते त्यामुळे ही नाराजी शपथविधीवेळी दिसून आली. नाराज आमदारांनी राजभवनाबाहेरच घोषणाबाजी सुरू केली. बंगळुरूशिवाय तुमाकुरुच्या सिरा, म्हैसूर, हावेरी, कोडागु आणि अन्य जिल्ह्यातही निदर्शने झाली. अनेक आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.