कर्नाटकात सत्तेचं नाटक जोरात; काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 03:39 PM2019-07-08T15:39:26+5:302019-07-08T15:41:08+5:30
कर्नाटकात एका दिवसात 31 जणांचे राजीनामे
बंगळुरू: स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेलं कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता जेडीएसच्या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे लवकरच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. त्यामध्ये आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज आमदारांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेस, जेडीएसच्या मंत्र्यांनी बंडखोर आमदारांना संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, तेवढ्यानं हे संकट टळेल का, की नव्या संकटाला आमंत्रण देईल, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. आधीपासूनच नाजूक स्थितीत असलेलं एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळण्याची शक्यता शनिवारपासून निर्माण झाली. कुमारस्वामी परदेश दौऱ्यावर असताना कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आलं. सरकार वाचवण्यासाठी आघाडीचे नेते निकराचे प्रयत्न करत आहेत, तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी भाजपचे नेते सज्ज आहेत.
कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकीदेखील उडत आहेत.