बंगळुरू : कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपा सरकारचे भवितव्य आज ठरणार आहे. विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार असून बहुमतासाठी यामधील किमान सहा जागांवर विजय मिळवणे येडियुरप्पा यांना गरजेचे आहे.
कर्नाटकात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीकरिता 68.91 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी आठ वाजता मत मोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 11 मतदान केंद्रावर मतमोजणी होणार असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात सत्तासंघर्ष झाला होता. काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, ज्या आमदारांनी राजीनामे देत एच .डी . कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते.
आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. दरम्यान, भाजपाचे 105 आमदार असून सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना आणखी 6 आमदारांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागा काँग्रेस आणि 3 जागा जेडीएसने लढवल्या आहेत.