बंगळुरु- दक्षिणेकडील राज्यात निवडणूक घोषणापत्रात बक्षिसे, भेटवस्तू देण्याची वचने असणे काही नवीन नाही. जनता दल सेक्युलरने आगामी निवडणुकीत विजयी झालो तर सर्व शेतकर्यांना एकाच वेळी संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली आहे. काल सोमवारी जनता दल सेक्युलरने आपला साठ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कर्जमाफीबरोबरच प्रतीमहिना पाच हजारापेक्षा कमी उत्पन्न असणार्या व पतीबरोबर संयुक्त जमीन पाच एकरपेक्षा कमी असल्यास त्या महिलेस दरमहा दोन हजार रुपयांची मदत सरकारतर्फे देण्यात येईल असे या घोषणापत्रात म्हटले आहे. ६५ वर्षांच्या प्रत्येक व्यक्तीस दरमहा ६ हजार पेन्शन आणि ९० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस दरमहा ८ हजार रुपये पेन्शन देण्याचे वचनही यामध्ये देण्यात आले आहे. अनुसुचित जाती आणि जमातींसाठी विशेष योजना आणि सर्व वर्गातील मुलींसाठी मोफत शिक्षणाचे आश्वासनही जेडीएसने दिले आहे.भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांतून काढलेल्या १ लाखा पर्यंतचे कर्ज माफ करु अशी घोषणा केली आहे. काँग्रेस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पातच मुलींसाठी पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ साली आपला पक्ष सत्तेत आल्यावर कर्जमाफी तरु असे म्हटले असले तरी कर्नाटकात कर्जमाफीचे कोणतेही आश्वासन त्यांच्या पक्षाने दिलेले नाही. मात्र विशेष कृषी- आर्थिक विभागांची स्थापना करु अशी घोषणा मात्र काँग्रेसने केली आहे.
Karnataka Assembly Election 2018: ''शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ''
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 12:58 PM