Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 05:36 PM2018-05-04T17:36:37+5:302018-05-04T17:36:37+5:30

सिद्धरामय्या हे दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत खरे, पण दोन्ही ठिकाणी त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागणार आहे.

Karnataka Assembly Election 2018: Will Siddaramaiah fight for two seats? | Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

googlenewsNext

बेंगळुरु- आपण केवळ एकाच जागेवरुन लढू अशी घोषणा करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी येत्या विधानसभेसाठी दोन जागांवरुन लढण्याचा निर्णय घेतला आहे. चामुंडेश्वरी आणि बदामी येथे दोन्ही ठिकाणी त्यांनी अर्ज भरले आहेत. या दोन्ही जागांवर आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांना वाटत असला तरी भाजपा आणि जनता दल सेक्युलर त्यांना पराभूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत. तसेच या दोन जागांवर प्रचार करावा लागत असल्याने आणि विरोधकांचा वाढता रेटा यामुळे सिद्धरामय्या यांना दोन्ही जागांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असे दिसते.



मुख्यमंत्री पदावरती असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.

1999 ते 2004 असे स्थिर सरकार देणाऱ्या आणि चांगले प्रशासक म्हणवल्या जाणाऱ्या एस. एम. कृष्णा यांना 2004 साली मतदारसंघ बदलावा लागला होता. त्यांनी मद्दूरऐवजी चामराजपेटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस जनता दल सेक्युलरचे नेते आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच.डी. कुमारस्वामीही दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. रमणगारा आणि चन्नपटट्ण अशा दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेले आहेत. 

 देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होती. तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र जीटी देवेगौडा जे वक्कलिंग समाजाची मते मिळवण्यासाठी मदत करायचे तसेच श्रीनिवास प्रसाद दलित मतासांठी मदत करायचे ते आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. बदामीमध्ये सिद्धरामय्या यांच्या कुरुबा समाजाची मते असली तरी लिंगायत आणि नायक समाजाची तेथे जवळपास 50 टक्के मते आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात नायक समाजाचे श्रीरामलू यांना उभे केले आहे. कर्नाटकामध्ये कॉंँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेत आली तर सिद्धरामय्या यांचे पक्षांतर्गत वजन चांगलेच वाढणार आहे. तसेच या दोन्ही जागांवर त्यांना यश आले तरीही तो त्यांचा मोठा विजय मानण्यात येईल, मात्र दोन्ही ठिकाणी ते पराभूत झाले तर मात्र भाजपा, जनता दल सेक्युलर त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडणार नाही.

Web Title: Karnataka Assembly Election 2018: Will Siddaramaiah fight for two seats?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.