दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकची मोहीम फत्ते करण्यासाठी काँग्रेसने यावेळी कंबर कसली आहे. दरम्यान, काही कलचाचण्यांमधूनही कर्नाटकमध्येकाँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांना विधानसभेच्या अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरीची भीती वाटत आहे. त्याचं संकेतही मिळू लागले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये तिकिटाचे दावेदार असलेल्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ दिसत आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी निकाल लागणार आहे.
एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे २० जागा अशा आहेत जिथे पार्टीच्या उमेदवाराचं नाव ठरवणं कठीण होत आहे. या जागांवर अनेक दावेदार आहेत. येथे काँग्रेसची स्थिती आधीपेक्षा बऱ्यापैकी असल्याने काँग्रेसला बंडखोरी झाल्यास नुकसान होण्याची भीती आहे.
काँग्रेसने १२४ जागांवर उमेदवारांची यादी आधीच प्रसिद्ध केली आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित १०० जागांमधील ७० ते ८० जागांवर उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पार्टीने बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील देवनहल्ली जागेवर माजी केंद्रीय मंत्री के.एच मुनियप्पा यांना उमेदवारी निश्चित केली हे. मात्र स्थानिक संघटना यामुळे नाराज आहे. पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे.
धारवार जिल्ह्यातील कलाघाटगी मतदारसंघात माजी मंत्री संतोष लाड आणि पक्षाचे पदाधिकारी असलेल्या नागराज छब्बी यांच्यामध्ये तिकिटांबाबत चढाओढ आहे. विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या यांचा लाड यांना पाठिंबा आहे. तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी छब्बी यांच्यासाठी तिकिटाची मागणी केली आहे. दरम्यान, लाड हे भाजपाच्या संपर्कात असून, काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास ते भाजपामधून लढू शकतात.
कित्तूरमध्ये काँग्रेसला ज्येष्ठ नेते डी.बी. इनामदार आणि त्यांचे नातेवाईक बाबासाहेब पाटील यांच्यात दिलजमाई करता आलेली नाही. या दोघांमध्ये तिकिटासाठी चढाओढ आहे. इनामदार हे आजारी असल्याने त्यांचा मुलगा किंवा सुनेला तिकीट मिळावं, अशी मागणी समर्थकाकडून करण्यात येत आहे. तर बाबाबसाहेब पाटील यांना सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बलवार आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचा पाठिंबा आहे.
दरम्यान, चिकमंगळुरूमध्ये पक्षाचे पदाधिकारी थमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत. थमय्या हे भाजपा आमदार सी.टी. रवी यांचे कट्टर समर्थक होते. या मुद्द्यावरून शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली होती.