दक्षिण भारतातील महत्त्वाचं राज्य आणि महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद सुरू असून काही महिन्यांपूर्वीच हा वाद देशपातळीवर चर्चेत होता. मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील मराठीजनांनी संताप व्यक्त केला होता. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कर्नाटकच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं होतं. त्यामुळेच, यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत सीमा भागांत मराठी उमेदवार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची चर्चा होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितील तेथे अपयश आल्याचंच स्पष्ट होत आहे. मात्र, दोन जागांवरील उमेदवार भाजप आणि काँग्रेसला फाईट देत असल्याचंही दिसत आहे. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस उमेदवारांचं वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे, बेळगावात काँग्रेसचं वातावरण टाईट बनलंय.
कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी झालेल्या मतदानात बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये कधी भाजपा, तर कधी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंतच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्सवरील कलांमध्ये काँग्रेस १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, ९० पेक्षा कमी जागांवर घसरली आहे. जेडीएसने २० ते ३० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, या सर्व जागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ४ उमेदवार असून त्यापैकी एकाही उमेदवाराला आघाडी मिळाली नाही. त्यामुळे येथे समितीला अपयश आलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रामुख्याने एकीकरण समितीच्या पाठिशी महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी उभे राहावे असे म्हटले होते. तर, शरद पवार यांनीही समितीच्या उमेदवारांविरुद्ध प्रचार करणे योग्य नसल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही मराठी माणसाला निवडून द्या, असे आवाहन करत एकप्रकारे महाराष्ट्र एकीकरण समितीलाचा अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, समितीच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील ४ मतदारसंघातून समितीचे खालील उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र, सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत.
खानापूर : मुरलीधर पाटील (महाराष्ट्र एकीकरण समिती)बेळगाव दक्षिण : रमाकांत कोंडूसकर (महाराष्ट्र एकीकरण समितीबेळगाव उत्तर : अमर येळ्ळूरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती)बेळगाव ग्रामीण : आर. एम. चौगुले (महाराष्ट्र एकीकरण समिती)
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत समितीचे खानापूर मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर पाटील यांना ५९४३ मतं मिळाली आहेत. तर, येथे भाजपचे विठ्ठल हलगेकर ३९३७९ मतांनी पहिल्या क्रमांकावर आघाडी घेऊन आहेत. बेळगाव दक्षिण मतदारसंघात रमाकांत कोंडूसकर आणि भाजप उमेदवारांत जोरदार लढत आहे. भाजपचे अभय पाटील ५८,७०४ मतांसह आघाडीवर असून कोंडुसकर हे ५१८२८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील अमर येळ्ळूरकर यांना ३४३६ मतं असून येथे भाजप उमेदवारडॉ. रवि पाटील २७६२७ मतांसह आघाडीवर आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेचे लक्ष्मी हेब्बाळकर ५३७०६ मतांसह आघाडीवर आहेत. येथील समितीचे उमेदवार आर.एम. चौघुले यांनी ३३४४८ मत घेतली आहेत.
दरम्यान, यावरुन, बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही उमेदवार पिछाडीवर आहेत.