मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली असून काँग्रेस समर्थकांसाठी आनंद देणारे कल दिसून येत आहेत. दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येथे काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला जोरदार टक्कर दिली होती. तसेच विविध कल चाचण्यांमधूनही काँग्रेस आघाडीवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता, सुरुवातीचे काही कल हाती आले असून या निकालानुसार काँग्रेसने १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार ९५ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
२२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये कधी भाजपा, तर कधी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंतच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्सवरील कलांमध्ये काँग्रेस १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, ९० पेक्षा कमी जागांवर घसरली आहे. जेडीएसने २० ते ३० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे, काँग्रेसला कर्नाटकात विजयाचा विश्वास असून काँग्रेस नेत्यांनी या निकालावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच, राजधानी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भांगडा नृत्याद्वारे आनंद व्यक्त होत आहे. बंगळुरू येथील कार्यालयाबाहेरही काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते एकत्र जमले असून विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे.
सोशल मीडियावरही कर्नाटक निकाल ट्रेंड करत असून काँग्रेस समर्थकांनी या आघाडीवर आनंद व्यक्त केला आहे. नेटीझन्सकडून काँग्रेसच्या विजयाचं ऑनलाईन सेलिब्रेशनही सुरू असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, काँग्रेस नेतेही निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देत असून कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देताना, कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचं त्यांनी म्हटलं.