Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप यावेळी विजयाची एकही संधी सोडू इच्छित नाही. भाजपचे स्टार प्रचारक राज्यात अनेक सभा घेणार आहेत. पीएम मोदीदेखील आगामी निवडणुकांसाठी राज्यात 20 ठिकाणी प्रचार करणार आहेत.
20 ठिकाणी निवडणूक प्रचार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीकर्नाटकात सुमारे 20 ठिकाणी निवडणूक रॅलींना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या प्रचार कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून अंतिम रूप दिले जात आहे. काही ठिकाणी पीएम मोदी रोड शोदेखील करणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे.
भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी तयार पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मजबूत टीमचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि प्रल्हाद जोशी यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीएम बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपचे प्रबळ नेते बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा, कर्नाटकातील काही मंत्री आणि राज्यातील पक्षाच्या नेत्यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.