Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यातच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने टीका सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केल्याने नवीन वाद सुरू झाला आहे. या घोषणेनंतर भाजपने राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिरात हनुमान चालिस पठण करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी आज (3 मे) दक्षिण कर्नाटकातील मुडबिद्री येथे एका सभेला संबोधित करताना जय श्री राम आणि बजरंग बली की जयचा नाराही दिला. राज्यात 10 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता भाजप राज्यातील प्रत्येक मंदिर, ग्रामपंचायत आणि शहरी भागात हनुमान चालिसेचे पठण करणार आहे.
'काँग्रेसचा तुष्टीकरणाचा इतिहास'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (2 मे) काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला दहशतवादाचा आणि तुष्टीकरणाचा इतिहास असल्याची टीका केली. तसेच, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरुनही काँग्रेसवर निशाणा साधला.यावेळी मोदींनी दिल्लीतील 2008 च्या बाटला हाऊस चकमकीचा मुद्दा उपस्थित केला आणि आरोप केला की, काँग्रेसचा दहशतवादाचा आणि तुष्टीकरणाचा इतिहास आहे. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसचा इतिहास आणि त्याची विचारसरणी कधीही विसरू नये, असेही ते म्हणाले.
'हनुमानाला कुलूप लावण्याचा प्रयत्न'विजयनगर जिल्ह्यातील होस्पेटमध्ये मोदींनी बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आणि हनुमानाची पूजा करणाऱ्यांना बंदिस्त करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले. ते म्हणाले, आज हनुमानजींच्या या पावन भूमीला नतमस्तक होणे हे माझे मोठे भाग्य आहे, पण दुर्दैव पहा, आज मी हनुमानजींना नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे आणि त्याचवेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला लॉक करण्याचा निर्णय घेतलाय, असेही मोदी म्हणाले.